Gold Rate : सोने चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोन्याची दीड लाखांच्या दिशेनं वाटचाल सुरु, चांदी 8000 रुपयांनी महागली
Gold Rate : जळगावात गेल्या पंधरा दिवसांपासून सोने चांदी दरात सातत्याने घसरण झाल्याचं पाहायला मिळाले होते. आता त्यात वाढ सुरु झाली आहे.
सोने आणि चांदीच्या दरात वाढ
जळगाव :गेल्या पंधरा दिवसांपासून सोने चांदी दरात सातत्याने घसरण झाल्याचं पाहायला मिळाले. मात्र गेल्या चोवीस तासात सोने चांदी दरात पुन्हा वाढ झाल्याने गुंतवणुकदारांना दिलासा मिळाला आहे.
काल सोन्याचे 145500 रुपये दर होते,त्यात आज 1700 रुपयांची वाढ होऊन ते दर आज 147200 वर गेले आहेत.चांदीचे दर काल 236000 इतक्या खाली गेल्याच्या नंतर आज त्या मध्ये 8000 रुपयांची वाढ होऊन चांदीचे दर 244000 वर गेले आहे.दोन्ही दर हे जीएसटी शिवायचे आहेत.

युद्ध जन्य परिस्थिती आणि वधारलेला डॉलर याचा परिणाम म्हणून सोने चांदी दरात चढ उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात देखील तेजी पाहायला मिळाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराची शक्यता वाढल्यानं सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑगस्टच्या वायद्याच्या सोन्याचे दर 832 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा एका तोळ्याचा दर 149764 रुपयांवर पोहोचला. तर, जुलैच्या वायद्याचा दर 2547 रुपयांनी वाढून 242200 रुपयांवर पोहोचला.डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ले थांबवण्याचे आदेश दिल्यानं त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर दिसून आला.

आंतरराष्ट्रीय बाजारात हाजीर सोन्याचा दर 4191.17 डॉलर प्रति औंसवर पोहोचला. तर, ऑगस्टच्या डिलिव्हरीच्या अमेरिकन गोल्ड फ्यूचर्सचा दर 4212.70 डॉलर प्रति औंसवर पोहोचला. तर चांदीचा दर 67.10 प्रति औंसवर पोहोचला आहे.








